Follow Your Passion
प्रत्येक माणसाचं आयुष्य हे रस्त्यासारखं असतं. रस्ता जसा भरधाव जाणाऱ्या वाहनाचा वेग स्पीड ब्रेकरच्या माध्यमातून कमी करतो, तसेच आपल्या आयुष्यातील काही प्रसंग आपल्या वाटचालीचा वेग कमी करतात. घाटातील रस्ता जसा वळणावळणावर विभागलेला असतो, तसंच आपलं आयुष्य देखील अनेक चित्रविचित्र प्रसंगांनी भरलेलं असतं. त्यातील काही प्रसंग आपल्याला हसवतात, तर काही प्रसंग आपल्याला रडवतात, काही प्रसंग आपल्याला शिकवतात, तर काही प्रसंग आपल्या आयुष्यात कौतुकाचे क्षण घेऊन येतात. आपल्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यात देखील आपली परीक्षा आणि आपला संयम पाहणारे अनेक प्रसंग येतात. काही वेळा त्या सर्व प्रसंगामुळे आपण दुःखी होतो, नैराश्यात जातो. आपल्याला नैराश्यातून बाहेर काढणाऱ्या, आपल्याला प्रेरणा देणाऱ्या अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला असतात, परंतू आपल्या आतमध्ये अशी एक गोष्ट असते, ती फक्त आपल्याला प्रेरणाच देत नाही तर प्रचंड पैसा, प्रसिद्धी, कौतुक आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आनंद सुद्धा देते. आपल्या आतमध्ये असलेली ती अनमोल गोष्ट म्हणजे “कला”.
कला आणि आपण
प्रचंड धावपळीच्या जगात वावरणारा माणूस आज त्याच्या कलेला विसरून गेला आहे. आपल्या आतमध्ये डोकावायला आणि स्वतःशी संवाद साधायला तो विसरून गेला आहे. त्यामुळेच आज ही कला देखील त्याला पोरकी झाली आहे. आपण एका घरात जन्म घेतो, मोठे झाल्यावर शाळेत आणि महाविद्यालयात जातो. वयात आल्यावर लग्न करतो. नोकरीनंतर निवृत्तीचं आयुष्य उपभोगत आणि आपल्या नातवंडांचा सांभाळ करत जगाचा निरोप घेतो. रूळलेल्या याच वाटेवरून न जाता स्वतःच्या आवडी निवडी जाणून आणि त्याचा विकास करून आज काही माणसे मोठी झाली आहेत. त्यांनी फक्त स्वतःच्या कलेला जाणलं नाही तर त्याचं करिअर मध्ये रूपांतर केलं. त्यातूनच या जगाला अनेक लेखक, अभिनेते, चित्रकार, गायक, खेळाडू आणि वैज्ञानिक मिळाले. त्यातीलच काहींची उदाहरणे आपल्याला भुरळ पाडतील.
कलेचे आपल्या आयुष्यातील महत्त्व
सचिन तेंडुलकरने वयाच्या आठव्या वर्षी क्रिकेटमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला होता. आपल्या कलेला, छंदाला करिअर मध्ये बदलण्याचा त्याचा हा निर्णय धाडसीच म्हणावा लागेल. तसेच माधुरी दिक्षितने देखील अगदी लहानपणीच उत्तम अभिनेत्री बनण्याचा निर्णय घेतला होता. रोनाल्डो सुद्धा अगदी लहानपणापासून चेंडूची खेळत असायचा. देशाविदेशात आपल्या चित्रांची प्रदर्शने भरवणारा शशिकांत धोत्रे हा लहानपणी विटांच्या तुकड्याने भिंतीवर चित्रे काढायचा. आपल्या लाडक्या लतादीदींनी सुद्धा अगदी शालेय जीवनापासूनच संगीत शिकावयास सुरवात केली होती. आता ही झाली काही दिग्गजांची उदाहरणे. या सर्वांनी आपल्या कलेला जीवनसाथी बनवलं. त्याच्यातच स्वतःला वाहून घेतलं आणि म्हणूनच ते या क्षेत्रात आज दिग्गज आहेत. चंद्र आणि सूर्य जोपर्यंत आहेत, तो पर्यंत त्यांचे त्यांच्या क्षेत्रात आणि या जगात नाव अजरामर आहे.
कला आपली वाट पाहतेय.
कला ही माणसाला घडवत असते. पावला पावलांवर त्याला आनंद देत असते. जेव्हा आपण आपल्या कलेसोबत जगत असतो, तेव्हा कसलेच दुःख आणि नैराश्य आपल्या मनाला शिवत नाही. आपण आपल्या आवडीच्या कामांमध्ये स्वतःला अगदी झोकून देऊ शकतो. आपल्या आयुष्यामध्ये इतकं महत्त्वाच्या असलेल्या कलेला आज आपण अडगळी मध्ये का टाकलं आहे? तिचा विचार आपण कधी करणार आहोत की नाही? स्वतःमध्ये आपण कधी डोकावणार आहोत? असे अनेक प्रश्न तुमच्या आतील कलेला पडले आहेत. आज प्रत्येकांमध्ये एक लेखक, अभिनेता, चित्रकार, खेळाडू, वक्ता, वैज्ञानिक आणि गायक दडलेला आहे. वेळ आहे ती फक्त त्याला जागं करण्याची. चला तर मग! करताय ना तुमच्या कलेचा पाठलाग?
कारण तुम्हाला घडविण्यासाठी ती तुमची वाट पहात आहे…
Read more DevOps